चलचित्र

परीचय ग्रंथ -
प्रकाशन सोहळा

पुढे पाहा...

छायाचित्र सज्जा

Sahitya Khanda Prakashan in Ratnagiri

 

पुढे पाहा...

नव्या चर्चा

नव्या चर्चा


 

 
 

प्रेरणा

• अक्षरभारती
• 'ह्र्दय' वेदना जाणणारे डॉ. संजय पाटील
• रुपाली
• विजय भागवत

 


 

अक्षरभारती

 

भारत 2020 पर्यंत विकसित राष्ट्र व्हावे, असे स्वप्न माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी पाहिले. डॉ. कलामांच्या विचारांनी प्रभावित झालेले एक आयटी इंजिनीअर अनुराग अग्रवाल यांनी हे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी आपण काय करू याबाबत आपल्या सिमॅंटेक कपंनीतल्या काही मित्रांसोबत चर्चा केली. या चर्चेतून एक अभिनव उपक्रम सुरू झाला तो म्हणजे ‘अक्षरभारती’! आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातील तसेच ग्रामीण भागातील लहान मुलांपर्यंत विविध पुस्तके पोहोचवून त्यांच्यात वाचनाची गोडी निर्माण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश. 19 एप्रिल 2007 रोजी या उपक्रमाची सुरुवात झाली. पुण्यातील सिमॅंटेक कंपनीतील चार इंजिनीअर मित्रांच्या कल्पनेतून प्रत्यक्षात आलेला हा उपक्रम वेगाने वाटचाल करू लागला. पहिल्या वर्षात ‘अक्षरभारती’ने साठ वाचनालयांचे लक्ष्य पूर्ण केले. पुढे आयबीएम, कॉग्निझंट, स्टार एंड, इन्फोटेक, इन्फोसिस या कंपनीतही ‘अक्षरभारती’चे कार्यकर्ते तयार झाले आहेत. ‘अक्षरभारती’ने सध्या पुणे परिसरासहित गोवा, कर्नाटक, जम्मू-काश्मीर व मेघालय अशा ठिकाणी 115 वाचनालये सुरू केली आहेत. ‘अक्षरभारती’चा को-ऑर्डिनेटर कैलास नरवडे सांगतो की, ‘‘आतापर्यंत ‘अक्षरभारती’च्या व्हॉलिंटियर्सची संख्या 650 झाली असून या दोन वर्षांत 10 हजारपेक्षा जास्त मुलांपर्यंत 80 हजारहून अधिक पुस्तके पोहोचली आहेत. हे व्हॉलिंटियर्स 25 ते 35 वयोगटातील आहेत.’’ ‘अक्षरभारती’ ‘सेवा इंटरनॅशनल’ या एनजीओशी संलग्न आहे. ‘अक्षरभारती’चे सर्व कार्यकर्ते हे आयटी क्षेत्रातील असल्यामुळे ते शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशीच या कार्यासाठी वेळ काढू शकतात. हिशेबाचे व इतर प्रशासकीय काम ‘सेवा इंटरनॅशनल’कडून केले जाते, त्यामुळे या कार्यकर्त्यांना वाचनाच्या प्रसाराला अधिक वेळ देता येतो. ज्या ठिकाणी ग्रंथालये नाहीत अशा ठिकाणी विविध स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने ग्रंथालये सुरू केली आहेत. स्वरूपवर्धीनी, सुराज्य, अपंग कल्याणकारी संस्था, जिजाऊ प्रतिष्ठान, स्वीकार, प्रथम, महाराष्ट्र एज्यूकेशन सोसायटी, भारत समाज सेवा केंद्र इ. संस्थांनी ‘अक्षरभारती ग्रंथालये’ सुरू केली आहेत. ‘अक्षरभारती’चे विजय सूर्यवंशी सांगतात की, ‘‘आम्ही वेगवेगळी पुस्तके वाचतच मोठे झालो. आता एवढंच वाटतं की आताच्या मुलांना पण या वाचनसंस्कृतीचं महत्त्व कळावं.’’ एकूण 100 ते 1 हजार पुस्तके एका संचात असतात आणि हे संच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तीन गटांत विभागलेले असतात. 5 ते 19 या वयोगटासाठी मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील ही पुस्तके असतात. पुस्तके निवडण्यात ‘अक्षरभारती’ काही शिक्षकांचे सहकार्य घेते. स्वयंसेवी संस्था निवडण्यापासून पुस्तकांची निवड, खरेदी, निधीसंकलन, नोंदी करणे, ग्रंथालयांची उभारणी करणे, त्यांची देखभाल करणे आदी सर्व कामे ‘अक्षरभारती’चे स्वयंसेवक करतात. विविध संस्थांतर्फे चालवल्या जाणार्‍या शाळा, झोपडपट्ट्यांतील शाळा, अनाथाश्रम, वनवासी व भटक्यांच्या पाड्यांवरील शाळा तसेच उमरगा येथील लमाण लोकांची वस्ती अशा ठिकाणी ‘अक्षरभारती’ची वाचनालये सुरू आहेत. एखादे ग्रंथालय सुरू केल्यानंतर त्याची देखभाल करण्यासाठी एक ‘अक्षरभारती’चा आणि एक स्थानिक कार्यकर्ता अशी व्यवस्था केली जाते. एखाद्या दिवशी जेव्हा एखाद्या नव्या वाचनालयात जाऊन पोहोचतो, तो दिवस या आयटी इंजिनीअरर्स आणि त्या मुलांसाठी खूप काही देऊन जाणारा असतो. हे दादा-ताई तिथल्या मुलांना पुस्तके वाचून दाखवतात. कधी छोटेसे नाटक बसवतात, तर कधी एखादा विज्ञानाचा प्रयोग करून दाखवतात. नंतर हे सगळे सहभोजनाचा आनंद लुटतात. दिवसभर या लहान मुलांमध्ये रमून हे आयटीतज्ज्ञ आपला सर्व ताणतणाव विसरतात. आयबीएम कंपनीतील संतोष पाटील सांगतो, ‘‘माझं गाव कोल्हापूरजवळचे. माझ्या गावी जेव्हा आम्ही ‘अक्षरभारती’चं ग्रंथालय सुरू केलं, तेव्हा तिथल्या शिक्षकांनी दिलेली शाबासकीची थाप महत्त्वाची होतीच, पण आपण आपल्या शाळेसाठी काहीतरी करू शकलो, याचं समाधान अधिक होतं.’’ ‘अक्षरभारती’च्या स्नेहमेळाव्याला आलेल्या भटक्या-विमुक्तांचे मनोगत फारच बोलके आहे. ‘‘या आयटी लोकांनी आमच्यातलं आणि समाजातलं अंतर संपवून टाकलं.ग्रंथामुळे त्यांनी आम्हाला समाजाच्या जवळ आणलं, जे इतक्या वर्षात कधीच झालं नव्हतं.’’ ‘अक्षरभारती’ला आता देशभरात सर्वदूर पोहोचायचे आहे आणि भारताच्या उदयात खारीचा वाटा उचलायचा आहे. गलेलठ्ठ पगार आणि चंगळवादी संस्कृतीचे पुरस्कर्ते अशा आयटी क्षेत्राबद्दल ज्या रूढ संकल्पना आहेत, या संकल्पनेला ‘अक्षरभारती’तील तरुणांनी आपल्या कर्तृत्वाने छेद दिला आहे.

संपर्क - Wed : www.aksharbharti.org Email : info@aksharbharti.org कैलास नरवडे -96045 33919

 

 


 

'ह्र्दय' वेदना जाणणारे डॉ. संजय पाटील

 

शहराचे वाढते आकर्षण हा सध्या सर्वत्र चिंतेचा आणि चर्चेचा विषय आहे. खास करून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिकांना शहर म्हणजे अलीबाबाची गुहाच वाटते. मोठाली इस्पितळे, तिथले दडपण वाढवणारे ‘कोरडे’ (चकचकीत असले तरी!) वातावरण आणि धक्का बसावा अशी ‘बिले’ याच चक्रव्यूहात अडकू पाहणारे डॉक्टर्स आपल्याला दिसतात. हे डॉक्टरांपुरतेच नाही. संस्कार आणि समाज याची जाण असणारे शिक्षकही शहराच्या आकर्षणापासून कुठे वाचलेत. शिक्षकच कशाला? वक्ते, कलावंत, व्यापारी सगळ्यांचीच धाव शहराकडे असते आणि सणावाराला यातला प्रत्येकजण ‘खरा भारत खेड्यातच राहतो!’ हे गुणगुणायला विसरत नाही. सटाणा येथील डॉ. संजय आणि डॉ. विजया पाटील या दाम्पत्यांचे मला याचसाठी वेगळेपण जाणवते. नाशिकसारख्या निरंतर विकसित होत जाणार्‍या शहरातील उत्तम प्रॅक्टीस सोडून ही मंडळी सटाणा येथे रमली याचे कौतुक वाटते. 1987 पर्यंत डॉ. संजय वसंतराव पाटील यांनी नाशकात चांगला जम बसवला होता, पण सटाण्याची हाक त्यांना शहरात रमू देत नव्हती. 1987 मध्ये म्हणूनच त्यांनी सटाणा येथे सर्व सोयींनी परिपूर्ण रुग्णालय सुरू केले. मालेगाव तालुक्यातील तेहरे गावच्या डॉ. विजया बाबुराव शेवाळे विजया संजय पाटील झाल्या आणि 1988 पासून या उभयतांनी सटाणा आपले सेवाक्षेत्र बनवले. एकदा अनपेक्षितपणे मी पाटील परिवाराशी जोडला गेलो. डॉ. संजय पाटील यांचे मला पत्र आले. महिना होता सरता जून.. निमंत्रण होते ऑगस्टमधील व्याख्यानाचे आणि ती होती ‘वसंत व्याख्यानमाला’ मी चक्रावून गेलो. ऑगस्ट महिन्या सटाण्यात ‘वसंत ऋतू’ असतो की काय! पण पुढे ध्यानात आले की या कुटुंबाच्या मनात सदैव वसंतच वसतीला असतो. वसंत व्याख्यानमाला ही डॉक्टरांनी त्यांचे वडील ‘वसंतराव’ यांच्या स्मृतिनिमित्त, पुण्यतिथीच्या पर्वावर योजली आहे. या व्याख्यानमालेचा समारोप गुणवंत विद्यार्थी आणि शून्यातून विश्व निर्माण करणार्‍या गुणीजनांचा गौरव करून होतो. वडिलांची पुण्यतिथी समाज प्रबोधनाने आणि गुणवंतांच्या गौरवाने करण्याची कल्पनाच मला फार भावली. पहिल्याच भेटीत आमचे ऋणानुबंध असे दृढ झाले की विचारता सोय नाही. कार्यक्रमाच्या नियोजनाची धांदल, जाणारा-येणारा आणि रुग्णालयाचा व्याप हे असूनही डॉ. संजयराव व डॉ. विजयाताई यांना सदैव हसतमुखच पाहिले. मी हसर्‍या डॉक्टरांच्या नेहमीच शोधात असतो. हे दोघे इतके मोकळे हसतात की रुग्ण निम्मा हसण्यानेच बरा होतो. अर्थात, निव्वळ ख्याली-खुशालीची मौज म्हणून या दाम्पत्याचे हसणे नाही. मनापासून आणि आनंदाने स्वीकृत कार्य करण्याचा संस्कार या दोघांवरही आहे. ग्रामीण क्षेत्रात काम करताना अडथळे आणि अडचणी येतच असतात, पण त्यावर मात करून मातृ-पितृ ऋण आणि समाज ऋण फेडण्यासाठी डॉ. संजयराव व विजयाताई उभेच आहेत याचे मोठे समाधान वाटते. परिसरासाठी, समाजासाठी काही चांगले करीत राहावे, अशी त्यांची धारणा आहे. हे करणेही उपकाराच्या नव्हे तर सेवेच्या भावनेचे आहे याचा जास्त आनंद! एक घटना-एक प्रेरणा साधी वाटणारी घटना आयुष्याची दिशा बदलते. डॉ संजय यांच्याबाबत तसेच घडले. सटाण्यात अद्ययावत रुग्णालय सुरू करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. नुसता पैसाच मिळवायचा तर नाशिक सोडण्याचे कारण नव्हते. त्यामुळे रुग्णालयही सेवेचे साधन बनले. हे असेच सुरू राहिले असते तर विशेष काही घडले असते की नसते देव जाणे! पण डॉक्टरांच्या वडिलांना स्व. वसंतराव दगाजी पाटील यांना हृदयाचा त्रास सुरू झाला. पुण्याला शस्त्रवयाही झाली. काही काळ त्यांची प्रकृती पुन्हा बिघडली. चाचण्या-तपासण्यानंतर परत (बायपास) शस्त्रक्रिया करावी लागेल असे तज्ज्ञांचे मत बनले. पण स्व वसंतराव यांनी दुसर्‍या शस्त्रक्रियेला स्पष्ट नकार दिला. दरम्यान शस्त्रक्रियेशिवाय ‘ब्लॉकेज’ दूर करण्याची उपचार पद्धती असून असे उपचार बंगलोरला होतात हे त्यांना समजले. स्व. वसंतराव यांनी सारी माहिती घेतली. डॉक्टरही ही माहिती घेतच होते. सर्वानुमते असे उपचार करायचे ठरले. उपचार झाले. प्रकृती ठणठणीत झाली आणि स्व. वसंतराव यांनी डॉ. संजय यांना या उपचार पद्धतीचे व्यवस्थित शिक्षण घेऊन ती उपचार पद्धती सटाणा येथे सुरू करण्याचा आग्रह केला. पित्याची इच्छा प्रमाण मानून डॉ. संजयराव यांनी ही उपचार पद्धती शास्त्रशुद्धतेने समजून घेतली आणि आज त्याच उपचाराचे परिपूर्ण केंद्र उभे राहिले. ‘निसर्गधाम!’ सटाणा येथील वसंतदादा नगरात सटाणा कॉलेजसमोर अत्यंत निसर्गरम्य परिसरात हे ‘निसर्गधाम’ उभे आहे. एका छोट्या नदीकिनारी उभे असलेले केंद्र म्हणजे पाटील परिवाराची सेवा स्वप्नपूर्ती आहे. नारळाची झाडी, बाजूला झुळझुळते पाणी, निसर्गाशी नाते सांगत उभ्या असलेल्या टुमदार घरांच्या रांगा, स्वच्छ रस्ते, स्वच्छ स्वयंपाकगृह, भोजनकक्ष, ध्यानमंदिर, रंजन सभागृह, मचाणासारखे वाचनालय, मनाला शांतीचा अनुभव देणारे संगीत आणि रस्त्या-घरांची नेमकी नावे ! इथे स्नेह पथ आहे, ध्यान पथ आहे, अन्नपूर्णा पथ आहे. आसन, प्राणायाम, प्रणव, प्रशांती, प्रत्याहार, मैत्र, करुणा नावाची घरे आहेत. नुसते पाहिले तर वाटावे ‘टुरिस्ट स्पॉट’ आहे, पण हे आहे महाराष्ट्रातील पहिले ‘किलेशन थेरपी सेंटर’! फोड-फाड न करता ब्लॉकेज दूर करणार्‍या उपचार पद्धतीचे केंद्र! हृदयविकारावर शस्त्रक्रियेशिवाय इलाज करणार्‍या या केंद्रात औषधोपचारासह ध्यान, योग, ओझोन थेरपी यांसह अक्युप्रेशर, होमिओपॅथी आणि आयुर्वेद उपचारही केले जातात. ‘हॉस्पिटल’चा अंश मात्र भाव (वातावरण) कुठेही जाणवत नाही. खरोखरच हे एक पर्यटन केंद्र वाटते. शरीर, मन व मेंदू यावर एकाचवेळी निरायमतेचे संस्कार करणारे हे केंद्र आहे. केलिचेन उपचार हृदयविकार हा सध्या वर्तमानाची ओळख झाला आहे. वय नाही की वेळवखत नाही. कुणीही हृदयरोगी होऊ शकतो. यावरची उपचार पद्धती महागडी आहेच, पण मनात भय निर्माण करणारी! हे भय जसे शस्त्रक्रियेचे तसेच ऑपरेशन करूनही जर... या जर तरचेही!! डॉ. संजय पाटील सांगतात, ‘केलिचेन ही तुलनेने स्वस्त, सोपी आणि सुरक्षित उपचार पद्धती आहे. उपचार घेतलेल्यांत नव्वद ते चौर्‍याण्णव टक्के रुग्णांना संपूर्ण फायदा झाला आहे. आजवर आमच्या केंद्रावर पाच ते साडेपाच हजार रुग्णांनी उपचार घेतले आहेत. देशाच्या जवळपास प्रत्येक प्रांतातून रुग्ण इथे येतात. निसर्गधाम म्हणजे छोटा भारतच आहे!’ केलिचेन म्हणजे एक विशिष्ट औषध योग्य प्रमाणात सलायनसारखे शिरेतून द्यायची पद्धत! ब्लॉकेज किती टक्के त्यावर डोस केवढा आणि किती काळ द्यायचा हे ठरते. डॉ. संजयराव सांगतात की, ‘‘94 टक्के ते 100 टक्के ब्लॉकेज असणार्‍या रुग्णास साधारण सव्वा ते दीड महिना केंद्रावर राहावे लागते. एक दिवसाआड एकदा उपचार केला जातो. ब्लॉकेज कमी असतील तर कमी काळ राहावे लागते. 100 टक्के ब्लॉकेजच्या उपचारासाठी 55 ते 60 हजार रुपये खर्च येतो. या खर्चात रुग्ण व त्याच्या सोबत असणारी व्यक्ती यांचे राहणे, भोजन याचाही समावेश असतो.’’ प्रत्यक्षात ‘निसर्गधामवर’ मी जाऊन आलो आहे. तिथल्या रुग्णांशी गप्पागोष्टी केल्या आहेत. ‘पैसे आगाऊ भरा, एवढे पैसे टाका मगच काय ते बोला’ अशी भाषा कुणाही रुग्णाला कधी ऐकू येत नाही. सारेच व्यवस्थेबद्दल समाधानी असतात. एखाद्याच्या परिस्थितीची डॉक्टरांना खात्री वाटली तर पैसा दुय्यम होतो. इथे महत्त्व माणुसकीला आहे. डॉ. संजयराव व डॉ. विजया या दोघांच्या वागण्यात सौजन्य आहे याचे कारण दोघांच्याही घरचे संस्कार तसे आहेत. समाजासाठी काहीतरी केले पाहिजे ही दोघांनाही शिकवण मिळाली आहे. डॉ. संजयराव यांच्यामागे समाजसेवेचा तीन पिढ्यांचा वारसा आहे. सत्यशोधक चळवळीचे प्रणेते असलेले डॉक्टरांचे पणजोबा अजबादादा विठ्ठल पाटील, आजोबा दगाजी अजबा पाटील आणि वडील वसंतराव पाटील यांनी समाजसेवेची गंगोत्री प्रवाहित ठेवली. नाशिक जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्थांची पायाभरणी आजोबांनी केली, तर वडिलांनी राजकीय पक्षाची धुरा समर्थपणे वाहिली. डॉ. संजयराव हाच वारसा चालवत आहेत. डॉ. विजयाताई यांनीही वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रात डॉक्टरांचे ‘व्यवस्थापन’ उत्तम सांभाळले आहे. ‘इथे येताना चिंतेत असणारा रुग्ण पूर्ण बरा होऊन हसत स्वत:च्या घरी जातो तोच आमचा सर्वात मोठा पुरस्कार असतो.’’ असे डॉ. विजयाताई म्हणतात यातच प्रेरणा, हेतू व प्राप्ती या सगळ्याचा खरा अर्थ समजतो. डॉ. संजय पाटील! जनरल प्रॅक्टिशनर म्हणून गेली दोन तपे कार्यरत आहेत. जेसिस, लायन्स, रोटरी या स्वयंसेवी संघटनांच्या माध्यमातून विविध उपक्रमांतून त्यांनी समाजसेवा केली आहे. क्रीडा क्षेत्राची आवड असणार्‍या डॉक्टरांनी शैक्षणिक जीवनात विविध क्रीडा स्पर्धा गाजवल्या आहेत. अ.भा. ग्राहक पंचायतीद्वाराही त्यांनी भरीव कार्य केलेआहे. विविध पुरस्कारांचे ते धनी आहेत. यश, लौकिक, प्रतिष्ठा सारे लाभूनही डॉ. संजय व डॉ. विजया दोघांचेही पाय जमिनीवरच आहेत. ज्यांचे जमिनीशी नाते असते ते सर्वांचेच हृदयस्थ असतात, नाही का?
- डॉ. संजय पाटील - 9422755033

 


 

रुपाली

 

‘कलर्स’ नावाच्या वाहिनीवर एकदा ‘बालिका वधू’ या मालिकेचा एक भाग बघत होतो. बालविवाहाच्या समस्येवरची ही सुंदर मालिका आहे. मालिका संपल्यावर सहजच मनात आले की, असे आजही घडते? माझी पत्नी म्हणाली, ‘‘न घडायला काय झाले? रूपालीचे असेच तर झाले!’’ आणि ही रूपाली कोण, असा विचार माझ्या मनात सुरू झाला. तिला मी शंभरदा पाहिले होते. कपड्यांना इस्त्री करून देण्याचे काम ती करते हेही मला माहीत होते. ‘‘माझी पाचची गाडी आहे, वेळेत देणार असशील, तरच ‘कपडे ने,’ असे मी तिला कधी दटावलेही आहे. क्वचित कधी तिचा दहा वर्षांचा मुलगा कपडे आणून देई अन् एखादा सदरा चुरगळलेला असे, तर मी चिडलोही आहे. कधी इस्त्री नीट झाली नाही तेव्हा ‘‘यापुढे माझे कपडे इस्त्रीला तिला देऊ नको.’’ असे फर्मानही बायकोला सोडले आहे, पण ‘बालिका वधू’ मालिकेनंतर बायकोने तिचा उल्लेख केला, तेव्हा मी एकदम म्हणालो, ‘‘रूपाली? म्हणजे?’’ माझी पत्नी म्हणाली, ‘‘तुम्ही खूपदा म्हणालात, कधी ती उशिरा कपडे देते, धड इस्त्रीही कधी नसते, तरी मी तिलाच कपडे देते, याचे कारण तिचा फिरणारा हात तीन लेकरांना पोसणारा आहे.’’ त्यावर मी म्हणालो, ‘‘तिचा नवरा आहे ना?’’ जगाची माहिती ठेवण्याची धडपड करणारा मी किती अडाणी आहे, असे माझ्या पत्नीला वाटले. ‘‘तीन पोरे पदरात टाकून तो मरण पावला. त्याला झाली चार वर्षे! दारू प्यायचा, गावाकडचे घर विकले. इथल्या खोल्या विकल्या. दारूनेच मेला!’’ आम्ही सारेच गप्प झालो. ‘‘तुमच्या सुनेच्याच वयाची आहे ती! सगळी मिळून चोवीस वर्षांची!’’ बायकोच्या या वाक्याने मी अधिकच गंभीर झालो. आज प्रथमच ती माझ्यासमोर बसली होती. माझ्या सुनेच्या वयाची पोर; तरी तीन पोरांची आई. मोठा शिवराज दहा वर्षांचा, मधला महादेव सात वर्षांचा आणि धाकटी ऐश्वर्या पाच वर्षांची. 24 वर्षांच्या बाईला दहा वर्षांचा मुलगा म्हणजे ही चक्क 14 ते 15 व्या वर्षीच आई झाली आणि 20 व्या वर्षी तीन पोरांची ही आई विधवा झाली. नवरा मेला तेव्हा ती पोरांसह उघड्यावर आली. शिवाय डोक्यावर साठ हजार रुपयांचे कर्ज! रूपाली सांगत होती, ‘‘एवढेच नाही साहेब, मी सात वर्षांची होते, तेव्हाच दोन पोरींची आई झाली होते, कारण मी सात वर्षांची असतानाच माझी आई वारली. दोन वर्षांची शशिकला आणि केवळ सहा महिन्यांची प्रियांका या पाठच्या बहिणींना मी सांभाळू लागले.’’ रूपालीचे सांगणे एकेताना मी अस्वस्थ झालो. रूपालीचे हे आगळे रूप मला अस्वस्थ करीत होते. माझी सून, पत्नीही बेचैन होती, पण रूपालीचा शांतपणा जणू मला ओरडून सांगत होता की, गरिबाघरच्या सगळ्याच पोरी खेळायच्या वयातच आई होतात. तेही लग्न न होता! रूपालीच आई अन् वडील रूपाली सातव्या वर्षी विजापुरात मिळेल ते काम करू लागली. कधी कुणी कामाच्या बदल्यात काही खायला द्यायचे, तर कधी दोन-चार रुपये मिळायचे. मिळेल ते घरी आणावे. बहिणींना द्यावे, आपणही खावे, असा दिनक्रम सुरू होता. आई जिथं धुणं-भांडी करायची तिथली बारीकसारीक कामे रूपालीला मिळायची. वडील हॉटेलात काम करून काही मिळवायचे, पण एवढी परीक्षा देवाला पुरेशी वाटली नसावी. रूपालीच्या अकराव्या वर्षी वडीलही वारले. दिवसाला आलेल्या पाहुण्यांनी रूपालीसाठी बाळासाहेब वारे यांचे ‘स्थळ’ सुचविले, अन् पुढे लग्न उरकूनही टाकले. 11 वर्षांच्या रूपालीचा बिजवर नवरा! रूपाली सांगते, ‘‘साहेब, माझ्या लग्नात माझ्या दोन्ही लहानग्या बहिणींनी माझे पाय पकडून ठेवले. आमच्या ताईला नेऊ नका, असे म्हणून रडू लागल्या. मग एक बहीण मी घेऊन आले आणि एक माझ्या चुलत चुलत्यांनी घेतली. श्रीमंत कोकाटे हे माझे चुलते.’’ माझ्या मनात प्रश्न आला की, रूपालीला सख्खे चुलते-मामा असतीलच ना? मी विचारल्यावर रूपाली म्हणाली, ‘‘आहेत, चुलते चांगले नोकरदार आहेत, पण माझ्या चुलत चुलत्याने धीर दिला, आधार दिला. नवरा गेल्यावर त्यांनीच खोपटासाठी थोडी जागा दिली. माझे वडील आजारी होते, तेव्हा हे चुलते आले होते. वडील म्हणाले, ‘‘माझ्यामागे त्या पोरी उघड्या पडतील. तू शब्द दे सांभाळीन म्हणून, तरच मी चहा-अन्न घेईन’’ चुलत्याने शब्द दिला. दोन दिवसांनी वडील वारले. चुलत्याने शब्द पाळला.’’ शब्दाला जागणार्‍या मोठ्या पुरुषांची दखल इतिहास घेतो, पण सामान्य माणूस म्हणून जगणार्‍यांची नोंद कोण घेणार? अशांच्या सुख-दु:खाच्या कहाण्या लिहायला इतिहासाजवळ शाई नसते, कागदही नसतो. म्हणूनच रूपालीसारख्या तिसरी-चवथी शिकलेल्या स्त्रीची संघर्षकथा अंधारातच राहते. 7 व्या वर्षी बहिणीची आई झालेल्या रूपालीने एका बहिणीचे लग्न स्वत:च्या ताकदीवर लावून दिले, तर एका बहिणीच्या लग्नासाठी जवळच्यांनी मदत केली. शशिकला विजापुरात आणि प्रियांका बेळगावात सुखाने नांदत आहेत, हे सांगताना रूपालीच्या डोळ्यांत समाधान चमकत होते. ‘‘नवरा जिवंत असताना तो कपडे इस्त्री करून देत असे, तेव्हा निदान चार पैसे तुझ्या हाती येत असतील ना?’’ माझ्या प्रश्नावर रूपाली म्हणाली, ‘‘11 वर्षांच्या पोरीला काय कळणार? पण व्यसनातच कमाई जायची. नवरा मोजून 15 ते 20 रुपये द्यायचा. दोन रुपयांचे हे, तीन रुपयांचे ते असे मोजून द्यायचा. बस् बाकी काही नाही.’’ मी डोळ्यांसमोर चित्र आणत होतो. तीन मुले, पिणारा नवरा, ती स्वत: आणि हातात 15 रुपये. 14 ते 15 वे वर्ष खेळण्याचे, त्यावेळी हे सगळे सांभाळणे हिला कसे शक्य झाले असेल? मी विचारल्यावर रूपाली म्हणाली, ‘‘हे सांभाळले एवढे खरे. आजही मी दिवसभर उभी राहून काम करते. कपडे आणायचे, इस्त्री झाल्यावर नेऊन द्यायचे हे काम मुलगा करतो.’’ मुलीला शिकवायचेय ! ‘‘साहेब, पोरांचे शिकण्यात काही डोके नाही. थोरला काम मात्र नीट करतो. रोज 15 घागरी पाणी भरतो. घर नीट ठेवतो, पण दहावीपर्यंत तरी त्याने शिकावे. पोरगी मात्र हुशार आहे. तिला शिकवणार आहे. तिचे आयुष्य चांगले झाले पाहिजे. पोरांना बोर्डिंगात ठेवावे म्हणते. चांगली संगत पाहिजे मग शिकले कमी-जादा तरी फरक पडत नाही. मला सध्या 80-90 रुपये रोज मिळतात. चांगले चाललेय. दोन महिन्यांपूर्वीच 70 हजारांचे नवर्‍याचे कर्ज फेडले. पोरांना पायावर उभे करायचे हे पक्के ठरवले आहे. कष्ट करेन, पण शिकवेनच पोरांना;’’ रूपालीची जिद्द तिच्या शब्दांतून प्रकट होत होती. आपली कर्म कहाणी सांगताना ती कुणाबद्दलही कटुतेने बोलत नव्हती. दु:ख-कष्टाचे प्रदर्शन करत नव्हती. उलट समाधानच अधिक होते. ‘‘तू सांगतेस त्या घटनांवरून तुझा जन्म 1985 चा असावा असे वाटते. तुला दिवस आणि महिना आठवतो’’ रूपाली म्हणाली, ‘‘मे महिना होता, दिवस आठवत नाही, पण वडील सकाळी लवकर उठवायचे. आंघोळ करायला लावायचे. चिमूटभर साखर तोंडात घालून म्हणायचे, ‘आज तुझा वाढदिवस’ एवढे आठवते साहेब.’’ रूपालीचा संघर्ष लोकोत्तर नाही, हे मलाही पटते, पण तरीही तिच्या संबंधाने लिहावे वाटले याचे कारण म्हणजे तिचे सकारात्मक चिंतन! काही ग्राहकांनी पैसे बुडवले त्याची तक्रार नाही. नवर्‍याच्या व्यसनाचा त्रागा नाही. दयेची अपेक्षा नाही. वडिलांच्या गरिबीपेक्षा वाढदिवसाला दिलेली चिमूटभर साखर आठवते. आताही लढताना तिच्या चेहर्‍यावर वैताग नाही. उलट उद्याचे उज्ज्वल स्वप्न घेऊन ती उभी आहे. सोलापुरच्या आसरा नगरातील रेल्वे पूल ओलांडून जुळे सोलापुरात प्रवेश करताना उजव्या हाताच्या टपर्‍यात एक टपरी रूपालीच्या इस्त्रीच्या दुकानाची आहे. एका बाजूला मोऽऽठा मॉल आहे. कालपर्यंत मॉलच्या झगमगटाकडेच माझे लक्ष जायचे, पण आज मात्र रूपालीच्या इस्त्रीतील जळते निखारेच मला जास्त आकर्षक वाटतात. त्यात जिद्दीने जगण्याची धग आहे. त्या धगीला माझा सलाम!

 


 

विजय भागवत

 

विज्ञान क्षेत्रातील विविध विषयांचा सोप्या आणि सर्वसामान्य माणसाला समजेल अशा मराठी भाषेतून प्रसार करणारे पुण्यातील विज्ञानलेखक वि.गो. भागवत यांचा मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांच्यातर्फे ‘मनोरमाबाई आपटे पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. त्याबद्दल त्यांचा हा अल्प परिचय. विजय गोपाळ भागवत यांचा जन्म 5 मे 1931 ला पुणे येथे झाला. त्यांचे वडील गोपाळ प्रभाकर भागवत पुण्यातील प्रख्यात वकील होते. आप्पासाहेब भागवत या नावाने ते परिचित होते. आप्पासाहेब रा.स्व. संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच जनसंघाचे नेते व पंधरा वर्षे नगरसेवक पद भूषविलेले होते. त्यामुळे या वातावरणातच विजय भागवतांचे बालपण घडले. विजय भागवत देखील बालपणापासून स्वयंसेवक व कार्यकर्ते झाले. लहानपणापासून लेखन वाचनाची आवड तसेच विज्ञान, चित्रकला, बागकाम, पक्षिपालन, मत्स्यपालन, विविध वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. मॅट्रिक झाल्यावर त्यांनी मराठी लघुलेखन व मराठी-इंग्रजी टंकलेखनात प्रावीण्य मिळविले. 1950 ते 1961 महाराष्ट्र शासनामध्ये नोकरी, 1961 ते 1989 पुणे विद्यापीठात प्रथम मराठी लघुलेखक म्हणून व नंतर कुलगुरूंच्या कार्यालयात नोकरी. 1989 मध्ये सेवानिवृत्त. पुणे विद्यापीठात असताना सुट्टीच्या वेळेत जयकर ग्रंथालयात बसून विज्ञानविषयक देशी विदेशी मासिके वाचण्याची आणि त्याद्वारे विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रांतील अद्ययावत माहिती जाणून घेण्याची त्यांना गोडी लागली आणि हे ज्ञान सोप्या मराठी भाषेतून सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने त्यांनी लेखनास प्रारंभ केला. गेली 38 वर्षे त्यांचे हे लेखन कार्य सुरू आहे. त्यांच्या लेखन प्रसिद्धीची सुरुवात 1970 मध्ये ‘कागदी घरे’ या शास्त्रीय शोधविषयक लेखाने दै. केसरी या वृत्तपत्रातून झाली. पुढे ‘सकाळ’, ‘लोकसत्ता’, ‘प्रभात’, ‘लोकमत’, ‘पुढारी’ या दैनिकांतून तसेच ‘सा. सकाळ’, ‘लोकप्रभा’ या साप्ताहिकांतून, तसेच ‘विचित्रविश्व’, ‘अमृत नवनीत’ या मासिकांतून त्यांचे लेख प्रसिद्ध झाले आहेत. विज्ञान व तंत्रज्ञान या विषयांतील आतापर्यंत 2500 लेख प्रसिद्ध झाले आहेत. वनस्पती, प्राणी, पक्षी, आरोग्यविषयक नव्या सेवासुविधा, सौरशक्ती, संगणक, पर्यावरण प्रदूषण, बालांसाठी संस्कार कथा या विषयांवर 700 लेख प्रसिद्ध झाले आहेत. या सर्वांची व्यवस्थित सूची त्यांच्याकडे उपलब्ध आहे. ‘अनमोल कथा’ हे पहिले पुस्तक 1981 - 82 मध्ये प्रकाशित झाले व त्यास महाराष्ट्र शासनाचा वाङ्मयीन पुरस्कार प्राप्त झाला. त्यानंतर चौदा पुस्तके निरनिराळ्या विषयांवर प्रसिद्ध झाली आहेत. यांमध्ये बालकथा, पक्षी, प्राणी, कीटक, सागरी प्राणी, मनोरंजक ज्ञान-विज्ञान असे विषय हाताळले आहेत. अजून चार पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. आतापर्यंत त्यांना विविध 9 पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत. आता त्यांना मराठी विज्ञान परिषदेचा प्रतिष्ठेचा 10वा पुरस्कार प्राप्त झाला आहे. अशी ही विजय भागवत यांची लेखन वाटचाल थक्क करणारी आहे. आजही वयाच्या 78 व्या वर्षी त्यांचे लेखन चालू आहे. दै. केसरी मध्ये ‘देश-विदेश’ या सदरामध्ये दर आठवड्याला ते लेखन करीत आहेत. या सर्व प्रवासात त्यांना त्यांच्या सुविद्य पत्नी जयश्री भागवत यांचे अनमोल सहकार्य लाभले आहे. सातत्य, चिकाटी, कष्ट व जिद्द या गुणांनीच भागवतांना हे यश प्राप्त झाले.